Dharwad

गोकाक पोलिसांची मोठी कारवाई; १५ दुचाकींसह दोन चोरट्यांना अटक

Share

सार्वजनिक ठिकाणी आपली दुचाकी उभी करण्यापूर्वी सावधान! गोकाक पोलिसांनी दुचाकी चोरांच्या एका टोळीचा छडा लावला असून त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून परशुराम हणबरट्टी (२२) आणि लगमन्ना मल्लन्नवर (१८) या सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ५ फेब्रुवारी रोजी गोकाक शहरात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करताना पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असता दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गोकाक, यमकनमर्डी, हुक्केरी आणि नेसरगी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. हे चोरटे प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकींवर डल्ला मारत असत. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १५ दुचाकी जप्त केल्या असून त्यांची किंमत ५ लाख रुपये इतकी आहे. या टोळीने आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास गोकाक पोलीस करत असून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags: