Bagalkot

रामपूरमध्ये बसस्थानकासाठी आरक्षित जमिनीवर अज्ञातांचा डल्ला

Share

बागलकोट तालुक्यातील रामपूर गावामध्ये बसस्थानकासाठी जागा मंजूर होऊन चार वर्षे उलटली तरी प्रशासकीय अनास्थेमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. हक्काचे बसस्थानक नसल्याने प्रवाशांना कचरा आणि धुळीच्या साम्राज्यात तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

बागलकोट मध्ये कृष्णा अपर प्रकल्पांतर्गत रामपूर गावामध्ये बसस्थानक उभारण्यासाठी २०२१ मध्येच १ एकर ११ गुंठे जमीन राखीव ठेवण्यात आली होती. मात्र जमिनीची मंजुरी मिळून चार वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप तिथे बांधकामाची एक वीटही रचली गेलेली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाकडे ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. या उदासिनतेचा फायदा घेऊन काही घटकांनी बसस्थानकासाठी असलेल्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून हे अतिक्रमण हटवून सार्वजनिक जागा सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे सध्या अस्तित्वात असलेल्या तात्पुरत्या बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असून कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. बसस्थानकामध्ये पिण्याचे पाणी, सावली आणि प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने वृद्ध आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सुसज्ज बसस्थानक उभारावे, अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Tags: