Khanapur

खानापूरमध्ये गॅरंटी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाचा जागर

Share

महिलांचे सक्षमीकरण झाल्याशिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही, असे मत पंच गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. खानापूरमध्ये आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्यांनी सरकारी योजनांमुळे महिलांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती आकडेवारीसह सादर केली.

खानापूरमधील शिवस्मारक येथे आयोजित महिला दिन आणि जनजगृती कार्यक्रमात बोलताना सूर्यकांत कुलकर्णी यांनी स्त्रीशक्तीचा सन्मान आणि सबलीकरणाची गरज अधोरेखित केली. खानापूर तालुक्यामध्ये गॅरंटी योजनांची कडक अंमलबजावणी होत असून, गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ हप्त्यांमध्ये तालुक्यातील महिलांच्या बँक खात्यात तब्बल ३५० कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय शक्ती योजनेतून ५३.९१ कोटी रुपये आणि गृहज्योती योजनेतून ५७.२४ कोटी रुपयांचा लाभ येथील जनतेला मिळाला असल्याची माहिती सूर्यकांत कुलकर्णी यांनी दिली.

यावेळी गृहलक्ष्मी योजनेच्या पैशांचा सदुपयोग करून आर्थिक प्रगती साधणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. अन्नभाग्य आणि युवा निधी योजनांबाबत अंगणवाडी सेविकांनी अधिक जनजागृती करावी, असे आवाहन करत महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाही सूर्यकांत कुलकर्णी यांनी दिली.

कार्यक्रमाला पंच गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे सचिव आणि तालुका पंचायत सीईओ रमेश मेत्री, सीडीपीओ विक्रम के.बी, प्राधिकरणाचे सदस्य बाबू हत्तरवाड, इसाक खान पठाण, वैष्णवी पाटील, सावित्री मादार, गीता अंबडगट्टी यांच्यासह अनेक मान्यवर आणि महिला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: