Hukkeri

हुक्केरीमध्ये ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवी यात्रेला उत्साहात प्रारंभ

Share

हुक्केरी शहराचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीची यात्रा हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर महास्वामी यांच्या उपस्थितीत आजपासून पाच दिवसांच्या कालावधीसाठी अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरू झाली आहे.

दर तीन वर्षांनी भरणाऱ्या या ऐतिहासिक यात्रेची सुरुवात आज पहाटे धार्मिक विधींनी झाली. बडिगेर बंधू, हक्कदार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत द्यामव्वा मंदिरात देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून पाळणा विधी पार पडला. चंद्रशेखर महास्वामी यांनी देवीचे दर्शन घेऊन ओटी भरली. ही यात्रा शांततेत पार पडावी आणि सर्वांनी या महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी भावना चंद्रशेखर महास्वामी यांनी व्यक्त केली.

मुख्य लक्ष्मी मंदिरात पूजा केल्यानंतर यात्रेला अधिकृत सुरुवात झाली. आज रात्री भंडारा उधळत पाळण्यातून देवीची मूर्ती हक्कदारांच्या घरी नेण्यात येणार असून तिथे ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गोकाकचे डीएसपी रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महंतेश बस्यापुरे यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

क्युआरएफ, केएसआरपी आणि जिल्हा राखीव दलाच्या तुकड्यांसह सुमारे ३०० पोलीस कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी संवेदनशील भागातून पथसंचलन करत सुरक्षेचा आढावा घेतला. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: