अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने ३० वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने हे कठोर पाऊल उचलले आहे. धारवाड जिल्ह्यातील अळणावर तालुक्यातील दोरी गावचा रहिवासी संजय विठ्ठल बैलूर (वय ३६) याने २०२५ मध्ये पुतणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पीएसआय एम. बी. बिरादार आणि पोलीस निरीक्षक एल. एच. गौंडी यांनी करून न्यायालयात भक्कम पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणाची सुनावणी बेळगावच्या विशेष पोक्सो न्यायालयात अवघ्या एका वर्षाच्या आत पूर्ण झाली. सुनावणी दरम्यान सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद मांडला. सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी संजय बैलूर याला दोषी ठरवून ३० वर्षे तुरुंगवास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या तपासात मजुनाथ मुसळी आणि प्रवीण होंडद या पोलीस कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.


Recent Comments