Khanapur

खानापूर तालुक्यातील सिंगिनकोप्पमध्ये भीषण आग; घर जळून खाक

Share

खानापूर तालुक्यातील सिंगिनकोप्प गावात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एक घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे १० लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले असून संबंधित कुटुंब हतबल झाले आहे.

सिंगिनकोप्प येथील रहिवासी स्वाती संतोष कुंभार यांच्या घराला काल संध्याकाळी अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करून संपूर्ण घराला कवेत घेतले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत घरातील कपडे, दागिने, रोकड, टीव्ही, फ्रीज आणि फर्निचरसह सर्व काही जळून खाक झाले आहे. ग्रामस्थांनी बोअरवेलच्या पाण्याचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत घराचे अतोनात नुकसान झाले होते.

कुंभार कुटुंब सध्या प्रचंड संकटात असून त्यांच्याकडे केवळ अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीही उरलेले नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली असली, तरी या गरीब कुटुंबाचे सर्वस्व नष्ट झाले आहे. या घटनेची दखल घेऊन लोकप्रतिनिधी आणि तालुका प्रशासनाने तातडीने पंचनामा करावा आणि पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: