Dharwad

धारवाडमध्ये मधमाश्यांच्या हल्ल्यात १५ जण जखमी

Share

धारवाड तालुक्यातील नरेंद्र गावात गुरुवारी सायंकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एकूण १५ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नरेंद्र गावातील मुख्य रस्त्यावरून नागरिक आणि दुचाकीस्वार जात असताना झाडावरील मधमाश्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत लोकांवर हल्ला चढवला. या अनपेक्षित प्रकारामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरील लोकांची मोठी पळापळ झाली. या हल्ल्यात १५ जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५ जखमींपैकी ८ जणांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मात्र, गंभीररीत्या जखमी झालेल्या उर्वरित सात जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags: