कित्तूर मतदारसंघातील कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची नवी पहाट उजाडली आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हायटेक ‘श्रमिक निवासी शाळे’च्या बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.


बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राजवळ, कामगार विभाग आणि इमारत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ३६.७५ कोटी रुपये खर्चातुन ही निवासी शाळा उभारण्यात येणार आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. गरीब आणि मध्यमवर्गीय कामगारांची मुले दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या संकल्पनेतून साकारत असलेली ही शाळा कित्तूर मतदारसंघाच्या शैक्षणिक इतिहासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
सुमारे ६०० विद्यार्थ्यांना एकाच वेळी निवासी शिक्षण देण्याची क्षमता असलेल्या या भव्य इमारतीचे काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण करून ती जनतेसाठी समर्पित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावेळी बोलताना, “कामगार विभागाच्या सुविधांचा लाभ घेणाऱ्या अपात्र व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा बाबासाहेब पाटील यांनी दिला. तसेच शाळांमध्ये मोबाईल बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला त्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला. मतदारसंघातील मुलांच्या भविष्यासाठी हा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी मंत्री संतोष लाड यांचे आभार मानले असून, आमदारांच्या या जनहितैषी कार्याचे स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.


Recent Comments