DEATH

मृत्यूतही सोबत! ५८ वर्षांच्या सहजीवनानंतर वृद्ध दांपत्याने एकाच दिवशी सोडला श्वास

Share

बागलकोट: बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुक्यातील होसरोळी गावातून एक अत्यंत भावूक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गेल्या ५८ वर्षांपासून सुखाचा संसार करणाऱ्या एका वृद्ध दांपत्याने मृत्यूतही एकमेकांची साथ सोडली नाही. पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही अवघ्या काही तासांतच प्राण सोडले. या प्रेमळ दांपत्याचा मृत्यू पाहून संपूर्ण गाव हळहळले असून ग्रामस्थांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांना निरोप दिला.

हृदयविकाराचा बसला दोघांनाही झटका
मिळालेल्या माहितीनुसार, होसरोळी गावातील अप्पन्ना गलगली (८४) यांना काल छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अप्पन्ना यांचा मृतदेह घरी आणल्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू होती. पतीचा मृतदेह पाहून पत्नी यल्लव्वा (७२) यांना मोठा धक्का बसला. त्यांच्याही छातीत अचानक वेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पुनर्विवाह करून दिला निरोप
५८ वर्षे एकमेकांच्या सावलीप्रमाणे राहणारे हे दांपत्य मृत्यूतही सोबत गेल्याने ग्रामस्थ भावूक झाले. गावच्या परंपरेनुसार, अशा दुर्मिळ घटनेवेळी दोन्ही मृतदेह शेजारी बसवून त्यांचा ‘पुनर्विवाह’ लावण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्यावर अक्षता टाकून या अतूट नात्याला वंदन केले. त्यानंतर गावातून त्यांची भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली आणि एकाच वेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकमेकांशिवाय जगणे अशक्य असल्याप्रमाणेच या वृद्ध दांपत्याने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या अनोख्या सहजीवनाची आणि मृत्यूची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.

Tags: