धारवाड जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, पशुसंवर्धन विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने केसीडी आवारात श्वान प्रदर्शन आणि भटक्या कुत्र्यांचे दत्तक विधान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश पाटील यांनी दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून केसीडी आवारात आयोजित श्वान प्रदर्शनात श्वानांच्या विविध जातींची माहिती देणे, श्वान पालनाबाबत जनजागृती करणे, त्यांचे आरोग्य, पोषण आणि लसीकरण यावर मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच रेबीज नियंत्रण आणि कुत्रा चावल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार याबद्दलही यावेळी माहिती दिली जाणार आहे. श्वान प्रदर्शनासाठी जागेवरच नोंदणीची सोय उपलब्ध असेल. भटक्या कुत्र्यांची पिल्ले दत्तक घेतल्यामुळे त्यांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होईल आणि मानव-प्राणी संघर्ष टळेल, असेही त्यांनी नमूद केले. दत्तक घेणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असून, पिल्लांचे रेबीज व इतर रोगांचे लसीकरण करूनच ती सुपूर्द केली जातील. तसेच जंतनाशक औषधे, नेक बेल्ट आणि संगोपनासाठी लागणाऱ्या साहित्याचे किटही मोफत दिले जाईल. प्रदर्शनातील उत्कृष्ट श्वानांना जात आणि लिंगानुसार विभागून आकर्षक बक्षिसे देण्यात येतील, असे भुवनेश पाटील यांनी सांगितले.


Recent Comments