बागलकोट येथील जुन्या पेठ भागात शिवजयंती मिरवणुकीला गालबोट लागले असून या घटनेत पोलीस अधीक्षकांसह काही नागरिक जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर प्रशासनाने शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करत २४ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

बागलकोटमधील जुन्या पेठेतील पंका मशीद परिसरामध्ये गुरुवारी उशिरा छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक जात असताना अचानक दगडफेक करण्यात आली. मशिदीजवळील तरुणांच्या एका गटाने मिरवणुकीतील डीजे चालक आणि शिवभक्तांना लक्ष्य करत दगड आणि चप्पलफेक केली असून ही सर्व घटना पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपी तंजीरसह एकूण आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून सरकारी कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे सिद्धार्थ गोयल यांनी सांगितले. सध्या किल्ला गल्ली आणि परिसरामध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हिंदू संघटनांच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बागलकोटचे उपविभागीय अधिकारी संतोष जगलासर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये बागलकोट, नवनगर आणि विद्यागिरी भागांत जमावबंदी लागू केली आहे. शहरात नागरिकांना विनापरवाना एकत्र येण्यास किंवा सभा घेण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे.
पुढील तपासासाठी आणि सुरक्षेसाठी शहरात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असल्याचे संतोष जगलासर यांनी म्हटले आहे.


Recent Comments