बेळगावहून येणाऱ्या एसटी बस खानापूर बसस्थानकात न नेणाऱ्या मुजोर चालकांना युवारक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच धडा शिकवला. हायवेवरून बस पळवून प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यकर्त्यांनी जाब विचारत बस स्थानकात नेण्यास भाग पाडले.

बेळगावहून येणाऱ्या हुनगुंद-मापसा एसटी बस खानापूर बसस्थानकात न येता बाहेरूनच जात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. बसस्थानकात प्रवासी तासन्तास वाट पाहत असतानाही, केवळ वेळ वाचवण्याच्या बहाण्याने चालक स्थानकात न जाता हायवेवरूनच बस पळवत होते. या बेजबाबदारपणाचा निषेध करत कर्नाटक युवारक्षण वेदिकेच्या खानापूर तालुका अध्यक्षांनी सहकाऱ्यांसह तातडीने बस अडवून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मनमानी मोडीत काढली.
“बसस्थानकात महिला आणि वृद्ध प्रवाशांची गैरसोय होत असताना तुमचा हा बेजबाबदारपणा का?” अशा शब्दांत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चालक आणि वाहकांना फैलावर घेतले. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत यापुढे सर्व बस सक्तीने स्थानकात नेण्याच्या सूचना दिल्या. रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या मदतीला धावून आलेल्या कर्नाटक युवारक्षण वेदिकेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments