Bagalkot

बागलकोटमध्ये वेठबिगारीचा पर्दाफाश; ओडिसाच्या २४ मजुरांची सुटका

Share

बागलकोट जिल्ह्यातील संकलापूर येथे वेठबिगारीच्या अमानुष प्रथेचा पर्दाफाश करत प्रशासनाने ओडिसाच्या २४ मजुरांची मुक्तता केली. वीटभट्टी मालकाने १० लाख रुपयांच्या बदल्यात या कुटुंबांना गुलाम म्हणून डांबून ठेवल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

बागलकोट जिल्ह्यातील इळकल तालुक्यातील संकलापूर गावात वेठबिगारीची अमानुष घटना उघडकीस आली आहे. वीटभट्टी मालक ईरप्पा कुंभार याने ओडिसातील २४ कामगार कुटुंबांना १० लाख रुपये देऊन जणू गुलाम म्हणून डांबून ठेवले होते. या मजुरांकडून अहोरात्र सक्तीने काम करून घेतले जात असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने ही मोठी कारवाई केली.

इळकलचे तहसीलदार अमरेश पम्मार आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी संकलापूर येथील वीटभट्टीवर अचानक धाड टाकली. यावेळी ओडिसातील २४ मजुरांची मालकाच्या तावडीतून सुटका करण्यात आली असून, मालक मजुरांना जनावरांसारखे राबवून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. बागलकोटचे जिल्हाधिकारी संगप्पा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या कारवाई दरम्यान अनेक लहान मुलेही कामावर असल्याचे आढळून आले आहे. कामगार विभागाने बालकामगारांची स्वतंत्र माहिती संकलित केली असून मालक ईरप्पा कुंभार विरोधात इळकल ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर वीटभट्ट्यांचीही सखोल तपासणी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांनी दिले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags: