धारवाड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजवणाऱ्या खेळाडूंना सोयीसुविधांची कमतरता भासू नये, यासाठी तातडीने कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हा पंचायत सीईओ भुवनेश पाटील यांनी दिले आहेत.


धारवाड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या खेळाडूंना अद्ययावत सोयीसुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासन आक्रमक झाले आहे. जिल्हा पंचायत सीईओ भुवनेश पाटील यांनी कुस्ती, जिम्नॅस्टिक आणि ॲथलेटिक्स यांसारख्या खेळांमधील गुणवत्ता टिकवण्यासाठी तातडीने कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सुसज्ज मैदाने, अत्याधुनिक जिम आणि दर्जेदार क्रीडा साहित्याचा समावेश असून, खेळाडूंच्या तातडीच्या उपचारासाठी क्रीडा विभागात स्वतंत्र डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही मागवण्यात आला आहे.

२०२६-२७ या वर्षासाठी क्रीडा शाळांमधील खेळाडूंच्या निवड प्रक्रियेचा प्रारंभ करताना, निवासी वसतिगृहातील मुलांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे बजावण्यात आले आहे. खेळाडूंना पोषक आणि जीवनसत्त्वयुक्त उच्च दर्जाचा आहार देण्याची जबाबदारी प्रशिक्षक व शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. खेळाडू शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत आगामी शैक्षणिक वर्षासाठीच्या निवड प्रक्रियेच्या भित्तीपत्रकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे उपसंचालक एस. एस. केळदीमठ, क्षेत्र शिक्षणाधिकारी रामकृष्ण सदलगी, उमेश बोम्मकनवर, महादेवी माडलगेरी यांच्यासह विविध क्रीडा शाळांचे अधीक्षक आणि प्रशिक्षक उपस्थित होते.


Recent Comments