बागलकोट जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बनशंकरी देवी यात्रा महोत्सवाच्या निधीमध्ये २० लाख रुपयांहून अधिक रकमेचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोळचगुड्डा ग्रामपंचायतीचे सचिव तथा प्रभारी पंचायत विकास अधिकारी वाय. वाय. स्वातनवर यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हा पंचायतीचे उपसचिव एन. वाय. बसरीगिडद यांनी या कारवाईचे आदेश जारी केले आहेत. २०२४ मध्ये पार पडलेल्या यात्रा महोत्सवामध्ये स्वातनवर यांनी सरकारी नियमांची पायमल्ली करत निधीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यात्रेतील दुकानांकडून गोळा केलेला कर सरकारी खात्यात जमा करण्याऐवजी तो त्यांनी स्वतःच्या खासगी खात्यात वळवला होता. पारदर्शक कारभारासाठी असलेल्या ‘पीओएस’ मशीनचा वापर न करता, केवळ छापील पावत्यांच्या आधारे तब्ब्ल २० लाख ४६ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
बदामी तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला होता. या अहवालात खरेदी केलेल्या साहित्याच्या नोंदी नसणे, निविदा प्रक्रियेचा अभाव आणि परस्पर दुसऱ्यांच्या नावे देयके काढून सरकारी पैशांची लूट करणे अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
कर्नाटक नागरी सेवा नियमांतर्गत कर्तव्यात कसूर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली स्वातनवर यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली असून, या निर्णयामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


Recent Comments