खानापूर बसस्थानकात परिवहन सेवेचा बोजवारा उडाला असून कामावरून घरी परतणाऱ्या महिला प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. डेपो मॅनेजरच्या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
खानापूर तालुक्यात बसची कमतरता असल्याने प्रवाशांना रोज नरकयातना भोगाव्या लागत आहेत. काल रात्री आठ वाजेपर्यंत नंदगड, बेकवाड आणि बिडी भागातील गावांना जाण्यासाठी एकही बस उपलब्ध नव्हती. बेळगावहून दांडेली आणि हळ्याळकडे जाणाऱ्या बसेस आधीच गच्च भरून येत असल्याने स्थानिक प्रवाशांना त्यात जागा मिळत नाही. अशा परिस्थितीत महिला प्रवाशांना साधे बसचे दरवाजेही उघडले जात नसल्याने वाहकांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
धारवाडला जाणाऱ्या लिंक बसेस चुकल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांना घरी जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. दिवसभर सरकारी कार्यालयात काम करून घरी परतणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत बसस्थानकातच थांबावे लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. स्थानिक मार्गांवर तात्काळ जादा बसेस सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.


Recent Comments