Khanapur

खानापूर तालुका पंचायत कार्यालयात राष्ट्रपुरुषांचा अवमान

Share

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुका पंचायतीच्या नूतन सभागृहात राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे न लावल्याने महापुरुषांचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्य कार्यालयातील या बेजबाबदारपणामुळे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी तालुका पंचायतीच्या महत्त्वाच्या सभागृहात एकाही राष्ट्रपुरुषाचे छायाचित्र लावलेले नाही. या प्रकारामुळे समाजसेवक ज्योतिबा बेंडिगेरी यांच्यासह सर्वसामान्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली असून संताप व्यक्त केला आहे.

एकीकडे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या सभागृहात राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे लावून त्यांना सन्मान दिला जातो. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी असूनही मेत्री यांनी याकडे दुर्लक्ष करून महापुरुषांविषयी अनादर दाखवला आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

खानापूर तालुका पंचायत सध्या विविध वादांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच नरेगाच्या सहाय्यक संचालिका रूपा बडकुंद्री यांनी सुट्टीच्या दिवशी सरकारी वाहनाचा वापर केल्याने वाद निर्माण झाला होता. आता कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांनी राष्ट्रपुरुषांची प्रतिमा न लावून त्यात भर घातली आहे.

तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतींच्या समस्यांबाबत विचारणा करण्यासाठी मेत्री यांना फोन केला तरी ते प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल वरिष्ठ आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: