Dharwad

धारवाड उपनगर पोलिसांकडून हुल्लडबाजांना दणका

Share

धारवाड उपनगर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये शनिवारी उशिरा संध्याकाळी पोलिसांनी ‘एरिया डॉमिनेशन’ मोहीम राबवली. यावेळी नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वागणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे.

धारवाड शहरातील सप्तापूर, कर्नाटक कॉलेज सर्कल यासह उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख चौक आणि गजबजलेल्या भागात पोलिसांनी संचलन करून आपली जरब निर्माण केली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे दुचाकीस्वार, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि मद्यपान करणारे तसेच विनाकारण चौकाचौकांत उभे राहून नागरिकांना त्रास देणाऱ्या हुल्लडबाजांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान पोलिसांनी संबंधितांना कायद्याचे धडे देत, पुन्हा अशा प्रकारची वर्तणूक आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या कारवाईत एसीपी प्रशांत सिद्धनगौडर, पोलीस निरीक्षक प्रभू गंगेनहळ्ळी, पीएसआय आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Tags: