Khanapur

खानापूर-अनोमोड रस्त्यावर भीषण अपघात; १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Share

खानापूर-अनोमोड रस्त्यावरील पाली गावाजवळ आज एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने १३ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक चालक जाफरसाब मर्दानसाब बंकापूर (वय ५२, रा. सलाईट, गोवा) हा अनोमोडहून खानापूरच्या दिशेने ट्रक (KA-22/C-9082) भरधाव वेगात घेऊन जात होता. पाली गावातील वनविभागाच्या चेकपोस्टजवळ आल्यावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकीला (GA-05/E-0141) भीषण धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार संजय विठोबा देसाई (वय ४०, रा. वर्लेवाडी, जोयडा, उत्तर कन्नड) यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर इजा झाली आहे. मात्र, दुचाकीच्या पाठीमागे बसलेला त्यांचा मुलगा समर्थ संजय देसाई (वय १३) याच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रक चालकालाही किरकोळ दुखापत झाली आहे.

याप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पित्यासमोरच पोटच्या मुलाचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: