बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर डिझेल तस्करीचा पर्दाफाश करणाऱ्या एका पेट्रोल पंप मालकाला माफियांकडून उघडपणे धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदवलेला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर शहराच्या वेशीवर असलेल्या एका गॅरेजमध्ये बेकायदेशीरपणे डिझेल विक्रीचा काळाबाजार सुरू होता. या तस्करीबाबत एचपी पेट्रोल पंपाचे मालक लोकण्णा कत्ती यांनी पोलीस अधीक्षक आणि मुधोळ सीपीआय यांच्याकडे रीतसर माहिती दिली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर या गैरप्रकाराचा पर्दाफाश केला. यामुळे संतापलेल्या माफियांच्या टोळीने आणि गॅरेजमधील तरुणांनी लोकण्णा यांना भररस्त्यात धमकी दिली असून, या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच माफियाने तस्करीसाठी वापरलेली मशिनरी आणि टँकर्स रातोरात गायब केले आहेत.
घटनास्थळावर तस्करीचे पुरावे उपलब्ध असतानाही पोलीस ‘तिथे काहीच नाही’ अशी भूमिका घेत फोटो काढून माघारी फिरत आहेत. जर हा प्रकार बेकायदेशीर नव्हता, तर रातोरात शेड आणि टँकर्स का हटवण्यात आले, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अग्निशमन दल आणि कर विभागाने मौन बाळगल्याने संशयाची सुई प्रशासनाकडे वळली आहे. या डिझेल माफियांच्या मुसक्या जिल्हा प्रशासन कधी आवळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments