बेळगावमधील डिझेल तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच आता बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर येथे कोट्यवधी रुपयांची करचोरी करून चालणारे डिझेल तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. एका गॅरेजच्या आडून सुरू असलेल्या या आंतरराज्य काळ्या बाजाराने प्रशासकीय यंत्रणेची झोप उडवली आहे.

मुधोळ तालुक्यातील लोकापूर शहराच्या उपनगरातील एका गॅरेजमध्ये दररोज शेकडो ट्रकना अवैधपणे डिझेल पुरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे. सुमारे २० हजार लिटर क्षमतेच्या अवाढव्य टँकरमधून हे डिझेल आणले जाते आणि पाण्याचा पंप वापरून लारींमध्ये भरले जाते. एका मोठ्या खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीचा यामागे हात असल्याची प्राथमिक माहिती असून, या कंपनीकडे २५० हून अधिक लारी आहेत. या तस्करीमुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
हे रॅकेट चालवण्यासाठी तस्करांनी अत्यंत चलाख पद्धतीचा वापर केला आहे. आरटीओ नोंदणीनुसार मालवाहतूक ट्रक असलेल्या वाहनांवर टँकर बसवून त्याला कर्नाटकचा बनावट नोंदणी क्रमांक लावला जात आहे. हे डिझेल प्रामुख्याने महाराष्ट्रातून तस्करी करून आणले जात असल्याचा संशय आहे. पेट्रोल पंप चालक लोकण्णा कत्ती यांनी या धाडसी प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. आता या आंतरराज्य माफियांची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे पोलीस तपासात स्पष्ट होईल.


Recent Comments