Dharwad

राज्यात चोऱ्यांचे सत्र वाढल्याने धारवाड पोलीस सतर्क; सराफ व्यावसायिकांची तातडीची बैठक संपन्न

Share

राज्यात वाढत्या चोरी आणि दरोड्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धारवाड पोलिसांनी शहरातील सराफ व्यावसायिकांची विशेष बैठक घेऊन सुरक्षा उपाययोजनांबाबत कडक सूचना दिल्या आहेत.

धारवाड येथील श्री दत्तात्रय मंदिर सभागृहात एसीपी प्रशांत सिद्धनगौडर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यावेळी शहरातील विविध सुवर्णपेढ्यांचे मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना एसीपी सिद्धनगौडर यांनी स्पष्ट केले की, दुकानांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असून, ज्या दुकानांमध्ये ही यंत्रणा नसेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच, शक्य असल्यास खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. दुकान बंद करताना कुलूप लावण्याबाबत विशेष खबरदारी घ्यावी आणि व्यवहार करताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर बारीक लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

व्यवसाय करताना कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाणे किंवा ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या बैठकीला शहर पोलीस निरीक्षक (सीपीय) अली शेख, पीएसआय नदाफ आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: