Dharwad

धारवाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; नऊ जणांवर हल्ला

Share

धारवाडमधील शिर्डी नगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत नऊ जणांना चावा घेऊन जखमी केले. बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये एका शाळकरी मुलाचाही समावेश आहे.

शिर्डी नगर परिसरात या कुत्र्याने समोर येईल त्या व्यक्तीवर हल्ला चढवला. शाळेतून घरी परतणाऱ्या ऋषीक नावाच्या मुलावर कुत्र्याने झडप घातली, ज्यामध्ये त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. ऋषीकसह गंगव्वा उप्पार, लक्ष्मी मादर, शीतल कबाडी अशा एकूण नऊ जणांना या पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या सततच्या हल्ल्यांमुळे शिर्डी नगरमधील रहिवासी संतप्त झाले होते. कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी लाठ्या आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने कुत्र्याला बेदम मारहाण केली, ज्यामध्ये कुत्र्याचा मृत्यू झाला. ही घटना धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: