बागलकोट जिल्ह्यातील सैदापूरजवळ तांदळाच्या ट्रकवर पडलेल्या दरोड्याने तांदूळ तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. रेशनच्या तांदळाची तस्करी करणाऱ्या टोळीला लुटणाऱ्या आठ आंतरराज्य दरोडेखोरांना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे.


गंगावती येथून कोल्हापूरकडे २५ टन तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला १० जानेवारी रोजी स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कारमधून आलेल्या आठ जणांच्या टोळीने अडवले होते. चालक बाबासाब रामदुर्ग याला मारहाण करून आणि डोळे बांधून त्याचे अपहरण करण्यात आले होते. दरोडेखोरांनी ट्रकमधील ६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा तांदूळ बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथे विकून पळ काढला होता. धक्कादायक म्हणजे, ट्रक मालकाने तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याने या प्रकरणात तांदूळ तस्करी माफियांचा सहभाग असल्याचा संशय बळावला आहे.

इन्स्टाग्राम व्हॉईस कॉल आणि इंटरनेट लोकेशनच्या आधारे पोलिसांनी दरोडेखोरांच्या परिचितांकडून मेसेज पाठवून त्यांना जाळ्यात ओढले. विजापूर येथील जाकीर मकानदार, सचिन नायकौडी यांच्यासह जमखंडी येथील आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३.९० लाख रुपये रोख, ट्रक आणि दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. बागलकोटचे एसपी सिद्धार्थ गोयल यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.



Recent Comments