Khanapur

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

Share

खानापूर तालुक्यातील कापोली गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची लाटणे आणि काठीने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कृत्यामुळे दोन चिमुकली मुले अनाथ झाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

किरण अविनाश बाळेकुंद्री (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, पती अविनाश मारुती बाळेकुंद्री याने हे अमानवीय कृत्य केले. किरण या गावात किराणा दुकान चालवत असत. व्यवसायानिमित्त त्या ग्राहकांशी फोनवर बोलत असत, मात्र पती अविनाश त्यांच्यावर संशय घेऊन वारंवार भांडण करत असे. याच रागातून २० जानेवारी रोजी पहाटे त्याने घरातच किरण यांच्यावर लाटणे आणि लाकडी दांडक्याने भीषण हल्ला केला. डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने किरण यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे १० वर्षांचा मुलगा आणि ६ वर्षांची मुलगी आईविना अनाथ झाले आहेत. नंदगड पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने कापोली परिसरात खळबळ उडाली आहे.

Tags: