Dharwad

धारवाडमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत पोलिसांकडून आगळीवेगळी जनजागृती

Share

अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, या उद्देशाने धारवाड वाहतूक पोलिसांनी यमराज आणि चंद्रगुप्ताच्या वेशभूषेतील कलाकारांसह शहरात जनजागृती मोहीम राबवली. पोलिसांच्या या अनोख्या प्रयत्नांची शहरभर चर्चा रंगली आहे.

धारवाड वाहतूक पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली जुने बसस्थानक, ज्युबिली वृत्त, कोर्ट सर्कल आणि विवेकानंद वृत्त यासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर ही मोहीम राबवण्यात आली. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर, बस आणि इतर वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. यावेळी नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या मोहिमेत एएसआय वीरेश बल्लारी, एएसआय सीता कटगी, एचसी शेखर हादिमनी, एचसी एम. एन. मल्लाडद, पीसी मंजुनाथ कडेमनी, पीसी बीरप्पा नाटीकर यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

वाहतुकीचे नियम हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाच्या रक्षणासाठी आहेत, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक श्रीनिवास यांनी व्यक्त केली.

Tags: