धारवाडजवळील नवलूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांना वनविभागाने चांगलाच दणका दिला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी केल्यानंतर नवलूरमध्ये कोणताही बिबट्या नसल्याचे स्पष्ट केले असून हे फोटो पूर्णपणे बनावट असल्याचे जाहीर केले आहे.

नवलूरजवळ बिबट्या आल्याचा दावा करत काही खोडसाळ तरुणांनी फोटो ‘एडिट’ करून ते व्हायरल केले होते. एका फोटोत कारच्या समोर बिबट्या उभा असल्याचे तर दुसऱ्या फोटोत तो एका गल्लीत बसल्याचे दाखवण्यात आले होते. या फोटोंमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तातडीने शोधमोहीम राबवली असता, तिथे बिबट्याचा कोणताही मागमूस आढळला नाही. तांत्रिक तपासणीत हे फोटो बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हे कृत्य करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कडक शब्दांत तंबी दिली आहे. अशा प्रकारे अफवा पसरवून समाजात भीती निर्माण केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


Recent Comments