बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील निराणी साखर कारखान्यातून गुजरातला पाठवण्यात येणारी साखर वाटेतच विकून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मुधोळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी या कारवाईत ९ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली कार, असा एकूण ११.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २०२५ साली नोव्हेंबर महिन्यामध्ये महेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून विशेष पोलीस पथकाने तपास सुरू केला होता. १५ जानेवारी रोजी जीरगाळ बायपासजवळ सापळा रचून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी ५० किलो वजनाची ६२० साखरेची पोती ट्रकद्वारे गुजरातला नेण्याऐवजी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे विकली होती.
साखर विकून मिळालेल्या १२.५० लाख रुपयांपैकी २.५० लाख रुपये खर्चून आरोपींनी एक कार खरेदी केली होती, तर उर्वरित रक्कम स्वतःच्या चैनीसाठी वापरली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून आता ९ लाख रुपये रोख आणि कार जप्त केली आहे. कारखान्याचा विश्वासघात करून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या आरोपींना गजाआड करण्यात मुधोळ पोलिसांना यश आले आहे.


Recent Comments