Khanapur

देवलत्ती सरकारी शाळेत भरला ‘बालबाजार’

Share

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवलत्ती येथील सरकारी माध्यमिक शाळेत एका आगळ्यावेगळ्या ‘बालबाजार’ आणि खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि स्वावलंबनाचे धडे मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले गुलाबजाम, पाणीपुरी, चुरमुऱ्यांचा सुका भेळ, भजी आणि केक यांसारख्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः भांडवल गुंतवून व्यापार केला आणि त्यातून मिळणारा नफा-तोटा याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विशेषतः पाणीपुरीच्या स्टॉलवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली असून विद्यार्थ्यांनी चांगला नफा मिळवत आनंद साजरा केला.

हा केवळ खाण्यापिण्याचा बाजार नसून भविष्यात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे हे एक व्यासपीठ असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची ही जिद्द आणि कष्ट पाहून स्थानिक नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले असून, सरकारी शाळांच्या सक्षमीकरणाचा हा उपक्रम एक उत्तम पुरावा ठरला आहे.

Tags: