बेळगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. भरधाव वेग आणि चालकांवरील नियंत्रण सुटल्याने या दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भरधाव वेग आणि चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बैरनट्टी ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडली. विकास जालेंदर वारकडे (वय ३५, रा. अमला, ता. धारूर, जि. बीड, महाराष्ट्र) असे मृत तरुणाचे नाव आहे. १३ जानेवारी रोजी रात्री विकास आपल्या दुचाकीवरून लक्ष्मीश्वरकडे जात असताना गुंडू उंदरी यांच्या शेताजवळ हा अपघात झाला. डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने विकास यांचा जागीच मृत्यू झाला. मृताची पत्नी सुरेखा वारकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुलगोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दुसऱ्या एका घटनेत, दोन दुचाकींच्या भीषण धडकेत एका तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. ही घटना गोकाक तालुक्यातील ममदापूर गावाच्या हद्दीत घडली. सिद्रायप्पा सिद्धप्पा जडगप्पगोळ (वय २५, रा. कनसगेरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सिद्रायप्पा आपल्या नातेवाईकासोबत दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. सिद्रायप्पा यांना गंभीर अवस्थेत गोकाक येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील अन्य चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोकाक ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Recent Comments