बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घनदाट जंगल भागात वास्तव्यास असलेल्या हक्की-पिक्कि आणि कातकरी समुदायासोबत ज्येष्ठ दलित नेते मल्लेश चौगुले व कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी यंदाची मकर संक्रांत अत्यंत अर्थपूर्ण पद्धतीने साजरी केली.


या कार्यकर्त्यांच्या चमूने आदिवासी पाड्यांना भेट देऊन तिथल्या नागरिकांच्या जीवनशैलीची आणि परंपरांची जवळीक साधून माहिती घेतली. विशेषतः समाजातील मुलांचे आरोग्य आणि त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत नेत्यांनी विचारपूस केली. वनवास सोसणाऱ्या या बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जंगलात राहणाऱ्या या समाजाच्या निरंतर संघर्षाला आपला पूर्ण पाठिंबा असून आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, असे मल्लेश चौगुले यांनी यावेळी म्हटले. सणाच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे आणि धान्याचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांना मिठाई वाटून सणाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी समुदायातील प्रमुखांनी दलित नेत्यांचा सत्कार केला. दिवसभर या बांधवांसोबत राहून आणि त्यांच्यासोबत भोजन करून नेत्यांनी सामाजिक समरसतेचा संदेश दिला.

या कार्यक्रमात जिल्हा सरचिटणीस राजशेखर हिंडलगी, खानापूर तालुका अध्यक्ष राघवेंद्र चलवादी, दयानंद हक्की-पिक्कि, मारुती कांबळे, बसवराज मादर, रवी मादर, संदीप कोलकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या बांधवांच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद फुलवल्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments