Hukkeri

रमेश कत्ती यांच्यावर शानूल तहसीलदार यांची सडकून टीका

Share

माजी खासदार रमेश कत्ती यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर केलेल्या आरोपांचा आणि अपमानजनक शब्दाच्या वापराचा काँग्रेस गॅरंटी योजनेचे तालुका अध्यक्ष शानूल तहसीलदार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. कत्ती यांच्या टीकेला तहसीलदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आज माध्यमांशी संवाद साधताना शानूल तहसीलदार म्हणाले की, माजी खासदार रमेश कत्ती यांनी आमचे नेते सतीश जारकीहोळी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरून अत्यंत खालच्या थराची टीका केली आहे. रमेश कत्ती यांनी हे लक्षात ठेवावे की, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत चिक्कोडी मतदारसंघात आमच्या पक्षाच्या उमेदवाराकडून पराभूत होऊन जनतेनेच तुम्हाला ‘चकवा’ दिला आहे.

संकेश्वरचा हिरा साखर कारखाना आज दुसऱ्या तालुक्यातील लोकांच्या हातात गेला आहे. बेळगाव डीसीसी बँक आणि राजेंद्र पाटील यांच्या नामनिर्देशित सदस्यत्वाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे स्थान दाखवून दिले आहे, हे तुम्ही विसरलात का? केवळ एका वीज सहकारी संस्थेचे पद तुमच्याकडे आहे म्हणून आमच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरणे थांबवा. २०२८ च्या निवडणुकीत आपली ताकद दाखवा, उगाच हताश होऊन बिनबुडाचे आरोप करू नका असे त्यांनी म्हटले.

आमचे सरकार गॅरंटी योजनांच्या माध्यमातून राज्याच्या घराघरात पोहोचले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे. तुमच्या पक्षाचे राज्याच्या जनतेसाठी कोणतेही योगदान नाही, असा आरोपही शानूल तहसीलदार यांनी केला आहे.

Tags: