Bagalkot

बागलकोट जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Share

बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील कुडलसंगम क्रॉस जवळ एका मानसिक रुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून पोलीस नराधमांचा शोध घेत आहेत.

बागलकोट तालुक्यातील बेकूर गावातील ४० वर्षीय घटस्फोटित महिला या अत्याचाराची बळी ठरली आहे. ५ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ही महिला अर्धवट शुद्धीत पडली होती. नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून तिला हुनगुंद येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला बागलकोट जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून तिथे उपचार सुरू आहेत.

पीडितेच्या गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हा अत्याचार एकाने केला की हे कृत्य सामूहिक आहे, हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

घटनेला अनेक दिवस उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही, अशी भावना व्यक्त करताना पीडितेचा भाऊ रवी मादर याला अश्रू अनावर झाले. आपल्या बहिणीला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पीडित महिला मानसिक रुग्ण असल्याने पोलिसांना तिची जबानी घेण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून आरोपींना पकडण्यासाठी जाळे विणले आहे. याप्रकरणी हुनगुंद पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ६४/१ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: