Dharwad

हुबळीतील महिला अत्याचाराची घटना लज्जास्पद

Share

हुबळी येथील केशवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला अटक करताना करण्यात आलेली मारहाण आणि गैरवर्तन हे अत्यंत निषेधार्ह असून संपूर्ण सुसंस्कृत समाजाला मान खाली घालायला लावणारी ही घटना असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते तथा आमदार अरविंद बेल्लद यांनी म्हटले आहे.

हुबळी येथील महिलेसोबत झालेल्या पोलीस गैरवर्तनाचा तीव्र निषेध करत, आमदार अरविंद बेल्लद यांनी या घटनेची तुलना ‘द्रौपदी वस्त्रहरणा’शी केली आहे. रक्षणकर्तेच भक्षक बनल्याची टीका करत, त्यांनी सिद्धरामय्या सरकारवर सत्तेचा गैरवापर आणि दडपशाहीचा आरोप केला. काँग्रेस नगरसेवकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका महिलेची विटंबना करणे ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी बाब असून, यातून राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःची खुर्ची वाचवण्यात मग्न असून गृहमंत्री या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. या अमानवी कृत्याला जबाबदार असणाऱ्या पोलीस आयुक्तांसह संबंधित कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कडक कारवाई न झाल्यास सरकारविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही बेल्लद यांनी यावेळी दिला आहे.

Tags: