Dharwad

धारवाडमध्ये भरदिवसा तरुणावर प्राणघातक हल्ला

Share

धारवाड येथील गजबजलेल्या सुपर मार्केट परिसरात आज दुपारी एका व्यक्तीवर चाकूने वार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. भरदिवसा झालेल्या या थरारामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

धारवाडमधील माळापूर येथील रहिवासी मोहम्मद नदीम असे जखमीचे नाव आहे. सोफियान नावाच्या तरुणाने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली आणि वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या दरम्यान सोफियानने अचानक मोहम्मद नदीमवर चाकूने सपासप वार केले.

ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी जखमीच्या मदतीसाठी धाव घेतली आणि तातडीने पोलिसांना पाचारण केले. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी सोफियानला ताब्यात घेतले आहे.

प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद नदीमला प्रारंभी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्याला हुबळीतील किम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. धारवाडचे एसीपी प्रशांत सिद्धनगौडर आणि निरीक्षक अली शेख यांनी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली असून, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Tags: