उडुपी येथील आगामी ‘पर्याय’ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे ६ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री तथा उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


मंगळवारी जिल्ह्यातील आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. उडुपी पर्याय सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी रस्त्यांची सुधारणा आणि शहरात आवश्यक असलेल्या सर्व नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले. महोत्सवासाठी कमी वेळ शिल्लक असल्याने दिवसा आणि रात्री अशा दोन्ही सत्रांत युद्धपातळीवर काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्ह्यातील सर्व आमदारांना विश्वासात घेऊन कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. या व्हिडिओ संवादात आमदार सुनील कुमार, किरण कुमार कोडगी, गुरुराज गंटिहोळी, गुर्मे सुरेश शेट्टी, जिल्हाधिकारी स्वरूपा टी. के. आणि विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.


Recent Comments