Udupi

उडुपीमध्ये हिंदू-मुस्लिम सलोख्याचे दर्शन

Share

उडुपीमध्ये ३५ वर्षांपूर्वी जागा मंजूर होऊनही वन विभागाच्या अडथळ्यामुळे घर बांधू न शकलेल्या एका गरीब हिंदू विधवेच्या मदतीसाठी शेजारील मुस्लिम महिलांनी पुढाकार घेतला आहे. उडुपीच्या दौऱ्यावर आलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन या महिलांनी मदतीची मागणी केल्याने येथील सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले आहे.

उडुपी येथील रहिवासी गिरिजा शेट्टीगार यांचे पती निवर्तले असून त्या सध्या भाड्याच्या घरात राहतात. त्यांना १९८९ मध्ये ५ सेंट्स जागा मंजूर झाली होती, मात्र ती जागा राखीव वन क्षेत्रात येत असल्याचा दावा करत वन अधिकाऱ्यांनी ताबा देण्यास नकार दिला. परिस्थिती बेताची असल्याने गिरिजा यांना याविरोधात लढा देणे शक्य नव्हते. हक्काची जागा असूनही त्या घर बांधू शकल्या नाहीत आणि मजुरी करून भाड्याच्या घरात राहत आहेत.

जागेचा ताबा मिळवण्यासाठी शेजारी राहणाऱ्या सलाहुद्दीन यांच्या कुटुंबीयांनी गिरिजा यांना अनेक अधिकाऱ्यांकडे नेले, मात्र फायदा झाला नाही. अखेर पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विश्रामगृहाबाहेर दोन मुस्लिम महिलांनी गिरिजा शेट्टीगार यांच्यासाठी न्यायाची मागणी केली. “हे बघा आमचे भारत; एका गरीब हिंदू महिलेसाठी मुस्लिम महिला डोळ्यात पाणी आणत आहेत, उडुपीमधील भाजप नेत्यांनी यांच्याकडून शिकले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी दिली. तसेच या महिलेला जागेचा ताबा मिळवून देण्यासाठी तात्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Tags: