एका गाभण हरणाने आपल्या पोटात इवल्याशा पाडसाला सामावून घेतले होते. अवघ्या काही दिवसांतच ते नव्या जिवाला जन्म देणार होते. मात्र, काळाला काही वेगळेच मान्य होते. अन्नाच्या शोधात आलेल्या या निरागस प्राण्यावर काळाने ट्रकच्या रूपाने झडप घातली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.

धारवाडमधील सत्तूर मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री ही हृदयद्रावक घटना घडली. अन्नाच्या शोधात जंगलातून लोकवस्तीकडे आलेले एक गाभण हरीण रस्ता ओलांडत असताना एका वेगवान ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू झाला.

भीषण वास्तव तेव्हा समोर आले, जेव्हा अपघाताच्या तीव्रतेमुळे मृत मादी हरणाच्या पोटातून दोन लहान पाडसे बाहेर पडली. अवघ्या काही दिवसात जगाचा प्रकाश पाहण्यापूर्वीच या पाडसांचाही मातेसोबत करुण अंत झाला. रात्री उशिरा ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. रस्त्यावर पडलेला तो मातेचा आणि तिच्या न जन्मलेल्या पाडसांचा मृतदेह पाहून प्रत्यक्षदर्शींचे डोळे पाणावले.


Recent Comments