Dharwad

धारवाडमध्ये रिक्षा चालकांचा संताप; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, पोलिसांशी खडाजंगी

Share

हुबळी-धारवाड या शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या रॅपिडो, नम्मा यात्री, ओला आणि उबर बाईक टॅक्सींवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी आज धारवाडमध्ये रिक्षा चालकांनी तीव्र निदर्शने केली.

उत्तर कर्नाटक ऑटो रिक्षा चालक संघ आणि धारवाड ऑटो रिक्षा चालक विकास संघातर्फे पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

धारवाडच्या कलाभवनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षा चालकांनी भव्य निषेध मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. “आम्ही किती वेळा निवेदने द्यायची? अधिकारी ठोस कारवाई का करत नाहीत?” असा सवाल करत संतप्त रिक्षा चालकांनी पोलिसांना धारेवर धरले.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावे या मागणीसाठी रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेढा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावरच आंदोलकांना रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली. बाईक टॅक्सी आणि खासगी ॲप आधारित सेवांमुळे रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून, प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे.

Tags: