Dharwad

पेटत्या कारमध्ये होरपळून लोकायुक्त पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

Share

कार गाडीने दुभाजकाला धडक दिल्यानंतर पेट्रोल टाकीला गळती लागून धारवाडमध्ये लोकायुक्त सीपीआय अर्थात पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा मृत्यू झाला आहे.

अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूर जवळील गदग -हुबळी राष्ट्रीय महामार्गावरील अरेरा पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता हि दुर्घटना घडली. गदग येथून हुबळीच्या दिशेने येत असताना नियंत्रण सुटलेल्या कार गाडीने रस्त्यावरील दुभाजकाला धडक देताच क्षणार्धात पेट घेतला. कार गाडीने दुभाजकाला धडक दिल्यानंतर पेट्रोल टाकीला गळती लागून एखाद्या ठिणगीमुळे कार गाडीने पेट घेतला असावा असा पोलिसांचा संशय आहे. पेटत्या कारमधून बाहेर पडत न आल्यामुळे सालीमठ यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर आगीने झपाट्याने कारला आपल्या विळख्यात घेतल्यामुळे ती संपूर्णपणे भस्मसात झाली. अपघात घडला त्यावेळी हावेरी येथे लोकायुक्त पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे पंचाक्षरी सालीमठ हे स्वतः कार चालवत होते, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. गदग येथील आपल्या कुटुंबीयांची भेट घेऊन परतत असताना दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघात स्थळी धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी भेट देऊन पाहणी केली.

Tags: