

धारवाडच्या विद्यागिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ‘पोलीस ठाणे दर्शन’ या विशेष अभियानांतर्गत कायद्याविषयी जागरूकता आणि पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कार्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना पोलिसांनी गुन्हेगारी आणि कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

धारवाड शहरातील विद्यागिरी पोलीस ठाण्यात शिक्षक आणि मुलांसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीची व्यवस्था, तसेच गुन्हेगारी आणि अपराधासंबंधीच्या घडामोडींची माहिती देऊन कायद्याविषयी जनजागृती केली. धारवाडच्या जेएसएस शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन त्यांनी कायद्याची माहिती घेतली. एखादी गुन्हेगारी कृती दृष्टीस पडल्यास प्राथमिक स्तरावर काय केले पाहिजे, तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास जीवनावर कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात, याबाबत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी मुलांना सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments