


भारत देशात विविध समुदायाचे लोक एकत्र राहतात आणि त्यांच्यात भेदभाव असू शकतो; परंतु कागवाड तालुक्यातील ऐनापूर शहराचा जातिनिरपेक्ष असणारा अमोघसिद्ध धर्म विशेष ठरला आहे.

ऐनापूर येथे वास्तुशांत कार्यक्रमानिमित्त विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी विजापूर जिल्ह्यातील मानकापूर गुरुपीठाचे सोमेश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, अमोघसिद्ध धर्म हा भक्तीत वास करणारा धर्म आहे. येथे जात-धर्माचा विचार न करता सर्व जण एकत्र येतात. हिंदूंसह मुस्लिम बांधवांनीही पालखीची सेवा केली. तीन लाख भाविकांनी एकत्र येऊन महाप्रसाद सेवन करणे, हे कार्य उर्वरित गावांसाठी आदर्श आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे उपाध्यक्ष राजुगौडा पाटील यांनी सांगितले की, “ऐनापूरमध्ये सुरू असलेला ४६ सत्यसिद्धांच्या भेटीचा हा ऐतिहासिक कार्यक्रम यशस्वी झाला आहे. शहरातील सर्व तरुण आणि संस्थांच्या सहकार्याने सुमारे तीन लाख भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. हा सोहळा ‘न भूतो न भविष्यति’ असा ठरला,” असा आनंद त्यांनी व्यक्त केला.
ऐनापूर नगरपंचायतीचे सदस्य संजय कुचनुरे यांनी माहिती दिली की, “कार्यक्रमात एकाच वेळी २५ ठिकाणी महाप्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. १० ट्रॅक्टर ट्रॉलीमधून भोजन आणून दिले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाविक विविध भोजनाचा लाभ घेत आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
जमखिंडीचे ख्यातनाम ढोल वादक निंगप्पा मंटूर आणि ऐनापूरचे निवृत्त मुख्याध्यापक आर. बी. बसण्णवर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी, ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने धर्मसभा आणि लक्षदीपोत्सव कार्यक्रम देखील उत्साहात पार पडला.


Recent Comments