Dharwad

५० नारळाची रोपे जगवण्यासाठी युवा शेतकऱ्याची धडपड

Share

अल्पभूधारक आणि बेताची परिस्थिती असलेल्या नवलगुंद येथील युवा शेतकऱ्याने कष्टातून फळबाग विकास विभागाकडून मिळवलेली नारळाची रोपे लावली. मात्र, ती रोपे जगवण्यासाठी त्याला दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील अरेकुरहट्टी गावातील ही दृश्ये आहेत. युवा शेतकरी अब्दुल खादर यांचे घर आहे. अब्दुल खादर गरीब कुटुंबातील युवा शेतकरी असून त्यांनी शेतीत काहीतरी करून आपले जीवन उभे करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या लहानशा शेतीत फळबाग विकास विभागाकडून ५० नारळाची रोपे घेऊन लावली आहेत. परंतु, वेळेवर पाऊस न झाल्यामुळे ही रोपे सुकायला लागली आहेत. ही रोपे वाचवण्यासाठी अब्दुल खादर आपल्या घरातील पाण्याची ढकलगाडी वापरून, सुमारे एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणून रोपांना देत आहेत. खड्डे असलेल्या रस्त्यातून पाण्याचे पिंप असलेली ढकलगाडी शेतापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांना दररोज खूप त्रास सहन करावा लागतो.

रोपे हातातून जातील या भीतीने, त्यांना जगवण्यासाठी ते दररोज गावाबाहेरील तलावातून ढकलगाडीने पाणी आणत आहेत. शेतात सुमारे २ लाख रुपयांचे शेड बांधलेल्या अब्दुल खादर हे सध्या अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते ढकलगाडीने रोपांना पाणी देऊन वाचवण्यासाठी धडपडत आहेत. खड्डेमुक्त रस्त्यासोबतच त्यांना मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन जीवनशैलीशी नारळाची रोपे जगवण्यासाठी सुरु असलेला त्यांचा संघर्ष त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात…

शेतीपासून दूर जात असलेल्या युवा पिढीसाठी अब्दुल खादर हे सध्या अनेक युवा शेतकऱ्यांचा आदर्श बनले आहेत. त्यांच्या शेतीप्रेमासह त्यांच्या संघर्षाचेही कौतुक होत आहे. सदर युवा शेतकऱ्याला जिल्हा प्रशासनाने किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड यांनी पुढाकार घेऊन पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी आता पुढे येत आहे.

Tags: