Kagawad

रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात करवेचा रास्ता रोको

Share

राज्याच्या सीमेवरील तालुक्‍यात असलेल्या कागवाड शहरात रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यांच्या सुधारणेसाठी वारंवार प्रशासनाकडे विनंत्या करूनही कोणताही उपयोग न झाल्याने, कर्नाटकरक्षण वेदिकेच्या कागवाड तालुका युनिटचे अध्यक्ष सिद्धू ओडेयर आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन केले.

कर्नाटकरक्षण वेदिकेच्या (करवे) कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी दाखल झालेले आमदार राजू कागे यांना रस्त्यांचा विकास करण्यासंबंधीचे निवेदन सादर केले.

करवेच्या कार्यकर्त्यांनी आमदार आणि अधिकाऱ्यांना निवेदन देताना सांगितले की, कागवाडच्या मुख्य रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोज होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसांत सर्व साखर कारखाने सुरू होणार असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारी वाढेल आणि त्यामुळे अपघातांची संख्या आणखी वाढण्याची भीती सर्वांना सतावत आहे. ही बाब लक्षात घेऊन, स्त्यांची दुरुस्ती करावी,” असे निवेदन त्यांनी सादर केले.

कागवाडचे आमदार राजू कागे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले की, कागवाड-मिरज, कागवाड-जमखंडी, कागवाड-चिकोडी, कागवाड-अथणी या मार्गांसाठी रस्ते विकासाकरिता निधी मंजूर झाला आहे. मिरज मार्गावरील काही झाडे काढून रस्ता रुंदीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. “तुमच्या मागण्या काही दिवसांत पूर्ण केल्या जातील,” असे आश्वासन त्यांनी दिले.

कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादीमनी यांनी निवेदन स्वीकारून मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आमदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. मगदूम यांना तातडीने सूचना दिल्या. यावेळी तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.

रास्ता रोको आंदोलनात कर्नाटकरक्षण वेदिकेचे तालुकाध्यक्ष सिद्धू वडेयर, शेतकरी अध्यक्ष गणेश कोळेकर, उपाध्यक्ष फारुख अलास्कर, महेश मटगरी, बाबासाहेब कोत्तलगे, असलम जमादार, अप्पासाहब गुंटमे, सचिन गावडे, हसन पाणारे, अल्लाबक्ष मुल्ला, जोतू पाटील, कृष्णा धोंडारे, सूरज परीट, रणजीत कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

Tags: