Dharwad

धर्मांतरास नकार दिल्याने धारवाडमध्ये पाच जणांवर हल्ला

Share

ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून, आधीच धर्मांतरित झालेल्या सात व्यक्तींनी मिळून पाच जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना धारवाडच्या केलगेरी परिसरातील हनुमान नगरमध्ये रविवारी घडली आहे.

या घटनेनंतर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपशहर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या परिसरात सुडुगाडू सिद्ध समाजाचे लोक राहतात. त्यापैकी दौडमनजप्पा बादगी, हनुमंतप्पा बादगी, यल्लप्पा बादगी, राजू बादगी, दुरगप्पा बादगी, नंदिश बादगी आणि कमलव्वा बादगी यांनी यापूर्वीच ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. हे धर्मांतरित झालेले लोक याच वस्तीतील अनेक लोकांना सतत धर्मांतर करण्यासाठी सांगत होते. काल रात्रीही याच विषयावरून वस्तीत जोरदार वाद झाला.

दुरगप्पा कोण्णूर, हनुमंतप्पा कोण्णूर, महेश कोण्णूर, अण्णप्पा बादगी आणि नागरेड्डू करियवर यांनी धर्मांतर करण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारावरून धर्मांतरित झालेल्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी रात्री अचानक घरात प्रवेश करून तीक्ष्ण हत्यारांनी मारहाण केल्याचा आरोप जखमींनी केला आहे. एवढेच नाही, तर वस्तीतील दुर्गादेवीचे मंदिर पाडून त्या ठिकाणी चर्च बांधण्यास सहकार्य करावे, यासाठी सातत्याने त्रास दिला जात होता, असेही हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.

या घटनेत जखमी झालेल्या पाचही जणांना धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणात जखमींनी धारवाड उपनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आहे.

Tags: