Dharwad

धारवाडमध्ये बायपासवर ट्रकची समोरासमोर धडक

Share

दोन ट्र्कमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला आहे. धारवाड बाह्यवळण मार्गावरील नरेंद्र जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

धारवाड तालुक्यातील नरेंद्र जवळील बायपास रस्त्यावर ही दुर्घटना घडली. बेळगावहून धारवाडकडे येणाऱ्या एका ट्रकला, विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिली. यामुळे चार जण जखमी झाले. अपघातामुळे एक ट्रक चालक ट्रकमध्येच अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. उर्वरित जखमींना धारवाड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सीपीआय एस.एस. कमतगी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतरच मृत चालक आणि जखमींची नावे समजू शकतील. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: