Belagavi

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कर्नाटक उत्तर रथयात्रा

Share

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कर्नाटक उत्तर रथयात्रा समारंभात डॉ. निधी त्रिपाठी यांनी देशातील महिलांना राणी ओब्बक्का यांच्याप्रमाणे लढून देश आणि संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले आहे.

बेळगाव येथील त्यागवीर सिरसंगी लिंगराज अरस महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कर्नाटक उत्तर रथयात्रा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी डॉ. निधी त्रिपाठी यांनी नमूद केले की, देश आणि तंत्रज्ञान अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहे. मात्र, राणी ओब्बक्कांची संस्कृती एआय पुढे नेऊ शकत नाही. आपली संस्कृती आणि आपली कला जतन करणे व त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे कार्य पुढे चालू ठेवणे, हीच राणी ओब्बक्कांना खरी श्रद्धांजली ठरेल.

“पूर्वी महिलांनी पुरुषांच्या आज्ञेनुसार चालावे, असे मानले जात होते. परंतु, राणी ओब्बक्का यांनी हे सर्व विचार मोडीत काढून रणांगणात वीरांगना म्हणून देशासाठी लढा दिला. पतीने विरोध केला तरीही राणी ओब्बक्का देशाच्या रक्षणाच्या कार्यातून मागे हटल्या नाहीत,” असे त्यांनी म्हटले. राणी ओब्बक्का जैन समाजाच्या असूनही त्यांनी शिवालय बांधले. उळ्ळाळ वंशाची सम्राज्ञी असलेल्या राणी ओब्बक्का यांनी सुमारे २०० गावांचा विकास केला आणि अनेक प्रकारच्या शिक्षणाची सोय उपलब्ध केली. “त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे कार्य केले,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी आमदार महांतेश कवठगिमठ, आनंद होसरकर, सचिन कुलेगार, हणमंत बागली, अभिषेक दोड्डमनी, सुचेत्रा शिंगे, रोहित उमनाबादीमठ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: