एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे पीक नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता बँकांनी नोटीस बजावली आहे. मुधोळ तालुक्यातील २३८ शेतकऱ्यांनी पीक कर्ज परत न केल्यामुळे कॅनरा बँकेने कोर्ट वॉरंट नोटीस जारी केली आहे. यामुळे दिशाहीन झालेले शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पीक कर्ज घेऊन ते परत न करणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांविरुद्ध मुधोळच्या कॅनरा बँकेने न्यायालयात खटला दाखल केला आहे. परिणामी, मुधोळच्या जेएमएफसी न्यायालयाने शेतकऱ्यांना नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यानंतर घाबरलेल्या शेतकऱ्यांनी बँकेसमोर येऊन अधिकाऱ्यांविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. सततच्या नैसर्गिक आपत्त्यांमुळे पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत असताना बँका अशा प्रकारे वागत आहेत, हे योग्य नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत २३८ शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून, बँक आणखी ६०० हून अधिक शेतकऱ्यांना नोटीस देण्याच्या तयारीत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.
शेतकऱ्यांना दिलेली वॉरंट नोटीस १८ सप्टेंबरपर्यंत मागे घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणी मुधोळच्या कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.


Recent Comments