बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी नोकरी मिळवल्याच्या आरोपावरून बागलकोट जिल्ह्यातील बीळगी तालुक्यातील नागराळ गावातील सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लाइनमन परसप्पा बिस्तन्नवर याने बोगस बहिरेपणाच्या प्रमाणपत्रांचा वापर करून ‘हेस्कॉम’मध्ये लाइनमनची नोकरी मिळवली. मात्र, हे प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी सरकारी रुग्णालयात आल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. मैसूरच्या रुग्णालयाच्या नावावर असलेल्या या प्रमाणपत्रावर बीळगी येथील डॉक्टरांची बनावट सही होती. हे पाहिल्यानंतर सरकारी डॉक्टर संजीव येडहल्ली यांनी परसप्पाविरुद्ध बीळगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, ‘एफआयआर’ देखील नोंदवण्यात आला आहे.

परसप्पा बिस्तन्नवर याने २०१७ मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप आहे. आता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी त्याने सरकारी डॉक्टरांची सही खोटी करून बनावट प्रमाणपत्र तयार करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणात परसप्पासह याच गावातील आणखी पाच जणांनीही बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ नवीन कोप्पळ आणि अरुण कोप्पळ, तसेच बसय्या लंगटद, शिवय्या लंगटद आणि विठ्ठल पोळेशी या सहा जणांविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यातील बसय्या २००९ मध्ये, तर इतर पाच जण २०१७ मध्ये कामावर रुजू झाले आहेत. या सहा जणांनी बहिरेपणाचे प्रमाणपत्र मिळवून, विशेष दिव्यांग कोट्यातून लाइनमनच्या पदावर नोकरी मिळवल्याचा आरोप आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बरगुंडी यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या हे सहा जण बागलकोट जिल्ह्यातील वेगवेगळ्या ‘हेस्कॉम’ कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत.


Recent Comments