कागवाड तालुक्यातील कागवाड, शेडबाळ, उगार खुर्द येथील नागरिकांसाठी ४३.६७ कोटी रुपयांच्या खर्चातून ‘अमृत २.०’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. खासदार प्रियांका जारकीहोळी आणि आमदार राजू कागे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

शुक्रवारी शेडबाळ येथे आमदार राजू कागे यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक शहरी पाणी पुरवठा आणि सांडपाणी मंडळाच्या वतीने आणि नगरपालिका संचालनालयाच्या ४३.६७ कोटी रुपयांच्या ‘अमृत २.०’ योजनेला सुरुवात झाली. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या की, ही योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक मदतीने सुरू करण्यात आली आहे. उगार नगरपालिका आणि कागवाड व शेडबाळ येथील नागरिकांना या योजनेतून २४ तास शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार राजू कागे म्हणाले, “प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था आणि पथदीप देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कागवाड मतदारसंघात प्रत्येकाला या सुविधा मिळाव्यात, यासाठी मी प्रयत्न करत आहे. ‘सह्याद्री’ कंपनी या योजनेचे काम करणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कर्नाटक शहरी पाणी पुरवठा आणि सांडपाणी मंडळाचे मुख्य अभियंता उमेश आर. के. आणि सहायक अभियंता अजित कुमार चौगले यांनी योजनेची माहिती दिली. त्यांनी खासदार आणि आमदारांचा सत्कारही केला. या कार्यक्रमाला सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक सत्यजीत नलवडे, सागर मगदूम, ठेकेदार ज्योतिबा चव्हाण, सन्मती शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद बरगाले, शेडबाळ नगरपंचायतीचे अध्यक्ष उत्कर्ष पाटील, उपाध्यक्षा दीपा होनकांबळे, मुख्याधिकारी सुरेश पत्तार, कागवाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी के. के. गावडे, पीएसआय राघवेंद्र खोत यांच्यासह उगार आणि शेडबाळ नगरपंचायतीचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments